या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Tuesday 6 December 2011

कथा कि व्यथा? एका कलिकेची !

     दवाचा तो पहिला थेंब उगाच कालिकेचे अंग अंग पुलकित करत होता नि सरसरून अंगावर शहारे आणत होता. रोज पहाटे त्याचा होणारा तो थंड स्पर्श तिलाही हवा असायचा ,दिवस संपून रात्र होऊन पहाटेच्या प्रतीक्षेत ती रोज असयाची ! पण सूर्य वर यायच्या  आधी ,पूर्वेला निळा,लाल ,केशरी रंगाच्या झिरमिळ्या दिसायच्या आधी अंधार बाजूला करत इतर झाडांचे आकार दिसायला लागले कि तिला शरमल्यासारखे व्हायचे ! कुणी पहिले तर उगाचच ती दवाला विचारायची ! तोही मग जास्तच रंगत यायचा नि तिच्या गुलाबी गालावर हळूच टिचकी मारायचा ,संपूर्ण शरीर ,कालिकेचे गोठवून टाकायचा ! तीही रंगून जायची आणि विसरून जायची बाजूचे सर्वकाही! आणि विरघळून जायची त्याच्या स्पर्शात ! कधी रंगाची झालर पसरली आणि कधी सूर्य वर आला याचे भानही नाही राहायचे तिला ! डोळे चोळत उठली कि वाटायचे तोही असेल इथेच पण तो चोर सूर्यदेवाचे आगमन होताच विरून जायचा हवेत ! व्यथित व्हायची पण इतरांची कौतुकाने भरलेली नजर उगाचंच तिचे मुखकमल आणखी उजळ बनवायची ! हे जादुभरले दिवस सुखाची आनंदाची उधळण करीत होते !
      प्रत्येकाला ,जो कोणी तिला पाहिल त्याला वाटायचे हिला मी माझ्याच फ्लॉवरपॉटची शोभा बनणार ! कुणीही जवळ आल तरी तिच्या सुगंधाने आणि सौंदर्याने मोहून जायचे . कुणाचेही अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत ,पाय  तिथे थबकायचेच ! अशी हि सुंदर गुलाब कलिका तिच्याच नादात असायची ,तिचा सुगंध नि सौंदर्य तिलाही मोहून टाकायचे आणि त्या लोभस आणि प्रिय दवाची तर सतत मनात कुठेतरी हजेरी असायची ,ती त्याच्याच स्वप्नात हरवून जायची ! तिचे त्याचे रोज पहाटेचे मिलन तिच्या रुपात अधिक भर घालत होते !आत्ता ती कलिका फुल बनू पाहत होती ! रोज पहाटे तो तीची एक एक पाकळी बाजूला घेत होता ,आता त्यांच्या प्रेमात अधिकच रंग आला होता ,तृप्तीच्या अनेक वाटा  त्यांना सापडल्या होत्या ! तिच्या उमलणाऱ्या प्रत्येक पाकळीबरोबर तिचे असंख्य चाहते रोज नवीन तयार होत होते लख्ख अश्या सूर्यप्रकाशात पण तिच्या जीवाला आवडणारा मात्र तो एकच होता ,तिचा लाडका दव....
    रोज उमलणारी कलिका,तिच्या सौंदर्यात आणि सुगंधात रोज पडणारी भर तिच्या आईच्या लक्षात येत होती ,आणि का ती बदलते आहे हेही तिला जाणवत होते ! आता कलिका रोज त्याची वाट पाहणे नि त्याच्या आठवणीत गुंतून जाने यातच हरवलेली ...प्रेमात असलेली ती, तिच्या रोमांचित आणि हर्षभरित आठवणी आणि तिच्यात भरत जाणारा सुगंध ,वाढत जाणारे सौंदर्य तिला स्वर्गसुखाची अनुभूती देत होते ...आणि ती दिवसाबरोबर आकर्षक होत होती ...पण आईला आता वेगळीच भीती वाटत होती ...ती म्हणजे तिच्यापासून दूर होण्याची ....कारण बहरात आलेले फुल दुसऱ्याचेच होते आतापर्यंत तिने अश्या कितीतरी कलीकांचे बलिदान दिले होते ... पण हि तिच्या जीवनातील सर्वोत्तम कलिका होती ...तिची आवडती कलिका ! 
      आज कलिकेने ठरवले होते कि काही झाले तरी ती दवाला विचारणार होती ,तो कधी निसर्गसाक्षीने तिला आपली बनवणार आहे ? सूर्यप्रकाशात तो तिला कधी माझी म्हणणार आहे ? तिला त्याच्या प्रेमाचा पूर्ण विश्वास होता ! रात्री ती झोपली नाही ,सुखाची प्रतीक्षा खूप मोठी असते कि भासते ? पण आजची रात्र खूप व्याकुळ गेली तिची ...प्रेमासाठी आसुसलेली ! पहाटे रोजच्या सवयीने दव आला आणि त्याने तिला बोलण्यासाठी ओठ उघडूच दिले नाहीत ...तीही विरघळली त्याच्या स्पर्शात जागी झाली तेव्हा सूर्याचे किरणरूपी हात तिला कुरवाळत होते नि सांगत होते गेला तो चोर आता तरी जागी हो !ती जागी झाली ,दव नाही हे पाहून विषन्न झाली आपोआप डोळ्यातील पाणी गालावर ओघळू लागले ,गालावरचे थेंब पानांवर पडू लागले ...तिची आई व्याकुळ झाली पण ...काय उपयोग ,तिची लाडकी कलिका आज तिला सोडून जाणार होती ...एका महालाची शोभा बनार होती ...तिच्या आईने खूप वेदना अनुभवल्या तिच्यापासून तुटताना पण तिच्या सुखासाठी ...? बरोबर थोडी पाने ,काही काटे दिले ...पाठराखण करायला ...आईच ती ! 
      तो सुंदर महाल ,जो संगमरवरी होता ..कलिकेचे डोळे दिपले ! खुश झाली ती खूप ,सुखाची चाहूल होती ती ! तिला ठेवण्यासाठी एक आकर्षक फ्लॉवरपॉट पाहून तर ती आनंदाने अधिक गुलाबी बनली . इतका सुंदर महाल आणि त्याहून सुंदर जोडीदार ,तिच्या आनंदाला सीमा नव्हती आज ...सुखाच्या संवेदनेने ती हुरळून गेली ,पण दवाने मारलेली टिचकीची आठवण  तिचे गाल आजही आरक्त करीत होती ...महालही तिच्या सुगंधाने आणि सौंदर्याने बहरला होता ! सुखाचे क्षण कापरासारखे उडून जातात... आज ती मागच्या रांगेत गेली कारण तिचा रंग आणि टवटवीत पण कमी झाला होता ..पण सुगंध तसाच ! रोज पाणी शिंपडले जायचे पण त्यात दवाचे प्रेम नव्हते ! भांड्यातले पाणी रोज बदलायचे पण आईचा स्पर्श नव्हता ,चकाकणारे दिवे सुंदर होते पण त्यात सूर्यकिरणांचा प्रेमळ स्पर्श नव्हता ...प्रेम आणि स्पर्शाशिवाय ती सुकू लागली ...आज तर ती कचर्याच्या टोपलीत गेली ! पण तिथेही तिने सर्व सडक्या कचर्याला सुगंधित केले ...तिचा स्वभावच तो ...तिथेही दुसर्याच्या म्हणजे कचर्याच्या सुखात ती सुखी होती ! 
     पण तिचा शेवटचा साथीदार सुगंध सुद्धा तिला सोडून गेला कारण ती आता कोरडी पडली होती ...आज रस्त्यावर पडलेल्या त्या मोहक कलीकेला सर्वजन तुडवत होते ...ते सर्वजन जे तिला काही दिवसापूर्वी आपल्या घराची शोभा बनवण्यास उत्सुक होते ...पण आज ती कलिका दु:खाणे आणि वेदनेने तळमळत होती ...आणि सुटकेसाठी आसुसली होती !!!!!    
  







3 comments:

rohinivinayak said...

अतिशय सुंदर लेखन!!!! खूप खूप आवडले!!!

सौ गीतांजली शेलार said...

धन्यवाद!

writetopaint said...

कल्पना छान आहे. आवडली. चांगल्या आणि जमलेल्या पोस्टमध्ये अशुद्ध लेखनाची बाधा येत आहे. कृपया ते सुधारून घ्या.