माझ्या मनात उमटलेले शब्द तुला कसे रे कळतात दोन समांतर रेषा अश्या कश्या एकमेकींना मिळतात? न उलगडलेले कोडे हे एक !
तुझ्या स्वप्नातले दिवे माझे घर कसे रे उजळतात
दोन ध्रुव पाहिले कधी असे एकमेकांना भेटतात?
न उलगडलेले कोडे हे एक !
माझ्या कल्पनेतले घर तुझे हात कसे रे सजवतात
दोन प्रभार असे कसे एकत्र नांदतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !
तुझ्या उरीच्या वेदना माझे आभाळ का रे झाकोळतात
दोन तीर नदीचे पाहिले कधी एकमेकांशी जुळतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !
माझ्या प्राक्तनातील ठसे तुझ्याही प्राक्तनात कसे रे उमटतात
क्षितिजावर आकाशधरा असे कसे गुजगोष्टी करतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !
तुझ्या हास्याचे तुषार माझे ओठ कसे रे विलग करतात
पाण्यावरही पाहिल्या कधी अग्नीच्या ज्वाला पेटतात ?
न उलगडलेले कोडे हे एक !
करशील का रे मदत मला हे कोडे सोडवायला
बघ मग नाही लागणार वेळ सुखाचा संसार घडवायला !
No comments:
Post a Comment