या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !

Wednesday 4 May 2011

सांजवेळ

                               '' सांज ये गोकुळी, सावळी सावळी ''  
 किती सुंदर वर्णन आहे हे गोकुळातल्या संध्याकाळच! खेड्यातली सायंकाळ इतकीच सुंदर!
मनाला चैतन्य देणारी!  सायंकाळी नदीच्या पाण्यात सूर्यदेवाने फेकलेला तो केशरी रंग,
 आसमंतात तो केशरी रंग उधळलेला आणि मनसुद्धा याच केशरी रंगानं भरून वाहणारं. 
अशी ही नवचैतन्य निर्माण करणारी खेड्यातली संध्याकाळ! दिवसभराच्या कष्टाने थकून
 भागूनप्रत्येकजण घराकडं निघालेला माणसापासून पक्षी गुरे सर्वजण! 
           '' दिवस मावाळीला लक्षमी शेताचा बांध चढ,
              तान्हा गं माझा राघु हाती गोफण पाया पड''  
  दिवे लागणीची ही वेळ कातरवेळ असते. आणि ती निवांत, शांत, व एकटी असेल तर काही
 सांगायलाच नको, मनाच्या तळाशी असलेल्या कडू गोड आठवणी तरंग होऊन कधी काठांनाभिडतात
 कळतच नाही. अश्या वेळी आठवणींचे पिसारे मन भरून टाकतात. मला ही वेळ मनाला उभारी देणारी
 भासते. असं वाटतं सारा निसर्ग, सारे आप्तेष्ट, माझा सुखाचा भूतकाळ आणि प्रेमाने भरलेला वर्तमान
 माझ्या या आयुष्याला एक सुखाची किनार बहाल करत आहेत.या सुखाचे या चैतन्याचे मी स्वागतच
 करणार आहे, अगदी भरल्या मनानं! 
           '' दिवस मावळीला तुम्ही दिव्याची जल्दी करा,
             लक्षमी आली घरा मोत्या पवळा यांनी वटी भरा.
  माझ्या बालपणी, मला आठवतं गाई गुरे दिवसभर रानात चरून संध्याकाळी घराची वाट धरत. गाई 
हम्बारत घराच्या ( गोठ्याच्या ) दिशेने धावतच येतात आणि त्याच वेळी गोठ्यातली वासरं गळ्यातलं 
दावा तोडण्याचा प्रयत्न करत आईच्या आवाजाला साद देत होती. गाय गोठ्यात येताच आई बाळाच्या 
मिलनाच ते दृश्य अवर्णनीय.
            '' दिवस मावळीला दिवा ओसरया बाईला,
              तान्हा ग माझा राघु सोडं वासरू गाईला.''
     अशी हि रम्य संध्याकाळ पुढे सरकत असतानाच नकळत अंधार संपूर्ण सृष्टीवर हळू हळू पांघरून 
घालायला लागतो. प्रत्येक जीव स्वप्नांच्या अंथरुणात पहुडतो, उद्याची सुख स्वप्ने आजच्यापेक्षा 
दुप्पट उमेदीने पूर्ण करण्यासाठी.........

                          ( हा माझा पहिलाच लेख-प्रपंच वाचकांनी गोड मानून घ्यावा हि विनंती.यामध्ये
  समाविष्ट केलेल्या जात्यावरच्या ओव्या माझ्या सासूबाई यांनी सांगितल्या आहेत त्या त्यांच्याच भाषेत 
मी देण्याचा प्रयत्न केला आहे )
             *जात्यावरच्या ओव्या - पूर्वीच्या काळी बायका पहाटे उठून जात्यावर दळण दळत त्या वेळी 
त्या ओव्या गात. आता त्या फक्त लग्नाच्या आधी घाना बांगड्या हा विधी असतो तेव्हाच ऐकायला मिळतात.       

1 comment:

Unknown said...

अभिनंदन,
पहिलाच लेख-प्रपंच गोडच आहे. सायंकाळी लागणारी ओढ सुंदर शब्दांत शब्दांकित केलेली आहे. सुरेख रचना आहे. पुढील पोस्टची प्रतिक्षा राहिल......

या गाण्यासंदर्भातील चलचित्राची दुवा http://www.youtube.com/watch?v=RZfLl-lMceE असा आहे.